दुःखद बातमी: गंगुबाई जोरगेवार (अम्मा) यांचे निधन..
चंद्रपूर/महाराष्ट्र
दि. 20 अक्टुबर 2024
सविस्तर : चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री, गंगुबाई जोरगेवार “अम्मा”, यांचे रविवार, 20 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09.15 वाजता निधन झाले. राजमाता निवास, कोतवाली वॉर्ड येथे झालेल्या या दुःखद घटनेमुळे चंद्रपूर शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंतिम यात्रा 21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09.00 वाजता राजमाता निवासस्थानातून निघणार आहे.
गंगुबाई जोरगेवार यांचे जीवन संघर्ष आणि दृढ संकल्पाने परिपूर्ण होते. त्यांनी अनेकांच्या आयुष्यात प्रेरणा निर्माण केली. किशोर जोरगेवार यांनी ‘राहो वा कुणी भुकेला उपाशी’ या उद्देशाने “अम्मा का टिफिन” योजना सुरू केली, ज्यामुळे चंद्रपूरातील निराधार माता व वृद्धांना मदत करण्यात आली. 17 डिसेंबर 2020 रोजी सुरू झालेल्या या योजनेत आजतागायत 120 गरजू लोकांना नियमितपणे घरपोच जेवण मिळत आहे.
या उपक्रमामध्ये अत्याधुनिक स्वंयपाक गृहाची व्यवस्था केली गेली आहे, जिथे आमदार जोरगेवार यांच्या परिवारातील सदस्य, सौ. कल्याणी किशोर जोरगेवार आणि सौ. रंजिता प्रशांत जोरगेवार, यावर लक्ष देतात. योजनेत वापरण्यात येणारे सर्व खाद्यपदार्थ उच्च दर्जाचे असून, हे भोजन प्रत्येक गरजूंना पोहचविण्यासाठी 10 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गंगुबाई जोरगेवार यांचे जीवन आदर्श ठरले आहे, आणि त्यांच्या कार्याची दखल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बारामतीच्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांसारख्या दिग्गज नेत्यांनी घेतली आहे. ‘अम्मा का टिफिन’ योजना चंद्रपूरमध्ये अविरत सुरू असून, भुकेल्यांच्या पोटाला आधार देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
आज गंगुबाई जोरगेवार यांना वृद्धापकाळाने कवटाळले, आणि जोरगेवार परिवारावर या संकटामुळे शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच श्रद्धांजली. त्यांच्या संघर्षशील जीवनाचे स्मरण करीत, अनेकांच्या आयुष्यात त्यांनी निर्माण केलेली प्रेरणा सदैव जिवंत राहील.