राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंचे जल्लोशात स्वागत
प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाने भारावले खेळाडू
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि . 21 डिसेंबर 2023
रिपोर्टर :- रमाकांत यादव जिल्हा प्रतिनिधि ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पूरी खबर :-चंद्रपूर, दि. 24 : चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा ज्वर आता जोमाने चढत असून विविध राज्यांमधून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुर येथे दाखल झालेल्या खेळाडूंचे जिल्हा प्रशासन, क्रीडा संघटना, पदाधिकारी व स्वागत समितीच्या वतीने जल्लोशात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन आणि स्वागताने क्रीडा स्पर्धेसाठी आलेले खेळाडू भारावून गेले आहेत.
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकुल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, क्रीडा संघटना व त्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आदींचा समावेश असलेल्या विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यात स्वागत समिती, निवास समिती, भोजन समिती, उद्घाटन समिती, वाहतूक व्यवस्था समिती आदींचा समावेश आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आजपासून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. चंद्रपुरात खेळाडू घेऊन येणा-या विविध राज्यांच्या प्रतिनिधींशी स्वागत समितीच्या सदस्यांनी सुरवातीपासूनच संपर्क केला असून, त्यांची ट्रेनची येण्याची वेळ लक्षात घेता नियोजन केले आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकावर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी झारखंड, उत्तराखंड, जम्मु काश्मिर, ओडीसा, पंजाब या राज्याातील खेळाडूंचे त्यांच्या प्रशिक्षकांसह चंद्रपूर व बल्लारपूर येथे आगमन झाले आहे. पुढील दोन दिवसांत सर्व राज्यातील खेळाडू चंद्रपूरात दाखल होतील, असे क्रीडा विभागाने कळविले आहे.