गुटखा तस्करी खाजगी रूग्णवाहिकेतून करणाऱ्या तीघांना अटक.
यवतमाळ ग्रामिण पोलिसांची कारवाई.
प्रतिनिधी । यवतमाळ: – शुभम जयस्वाल
दि. 16 दिसंबर 2021
सविस्तर बातमी:- खाजगी रूग्णवाहिकेतून गुटखा तस्करी करणाऱ्या तीघांना यवतमाळ ग्रामिण पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, दि. १४ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास आर्णी मार्गावर असलेल्या जगदंबा कॉलेज परिसरात करण्यात आली. या कारवाईत अवैध गुटखा आणि मारोती व्हॅन असा जवळपास दोन लाख २८ हजार ८०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अजित अनिल दुड्डेकर वय २३ वर्ष, प्रदिप थावरा राठोड वय २७ वर्ष आणि सैय्यद रहेमान सैय्यद उमर वय २४ वर्ष सर्व रा. अमराईपुरा आर्णी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहे.
या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातून आर्णी मार्गाने एका खाजगी रूग्णवाहिकेतून (मारोती व्हॅन) अवैधरित्या गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ ग्रामिण पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी आर्णी मार्गावर सापळा रचून संशयीत खाजगी रूग्णवाहिका (मारोती व्हॅन) क्रमांक एमएच-२९-टी-३२६५ किन्ही गावालगत असलेल्या जंगदंबा इंजीनियर कॉलेजजवळ अडविली. यावेळी चालकाची चौकशी करीत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली. दरम्यान या वाहनात सुगंधीत तंबाखू गुटखा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी गुटखा आणि खाजगी रूग्णवाहिका (मारोती व्हॅन) असा एकूण दोन लाख २८ हजार ८०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ग्रामिण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर जुनघरे, जमादार कैलास लोथे, संदीप मेहत्रे, रूपेश नेवारे, जांभुळकर, विक्की राऊत यांनी पार पाडली.