विद्यार्थिनीची नौकरी वाचली: निलेश बेलखेडे यांच्या तत्परतेने DBATU चा भोंगळ कारभार उघड..

46

विद्यार्थिनीची नौकरी वाचली: निलेश बेलखेडे यांच्या तत्परतेने DBATU चा भोंगळ कारभार उघड..

 

चंद्रपूर/महाराष्ट्र 

दि.08 डिसेंबर 2024

चंद्रपूर: प्रतिनिधी 

सविस्तर बातमी :- DBATU रायगड विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ढिसाळ कारभारामुळे एका विद्यार्थिनीच्या करिअरवर गदा येण्याची वेळ आली होती. विद्यार्थिनीला पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरी लागली होती, मात्र तिच्या पाचव्या सेमिस्टरची मार्कशीट वेळेवर मिळाली नसल्यामुळे कंपनीने 10 दिवसांत सर्व मार्कशीट सादर करण्याचा अल्टिमेटम दिला होता.

महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठाच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरत विद्यार्थिनीचे पालक वारंवार पाठपुरावा करूनही समस्या सुटली नाही. अखेर पालकांनी शिवसेना नगरसेवक सिक्की भैया यादव यांच्यामार्फत युवासेना सचिव इंजि. निलेश बेलखेडे यांच्याशी संपर्क साधला.

निलेश बेलखेडे यांनी लगेचच परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि विद्यापीठाच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला. कुलगुरू आणि संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले. विद्यापीठाच्या गलथान कारभारावर आवाज उठवत त्यांनी भविष्यातील अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही दिला. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे अवघ्या एका तासात विद्यार्थिनीची पाचव्या सेमिस्टरची मार्कशीट उपलब्ध झाली.

विद्यार्थिनीच्या पालकांचा आभार व्यक्त

विद्यार्थिनी व तिच्या पालकांनी शिवसेना युवासेनेचे विशेष आभार मानले आणि वेळेत केलेल्या सहाय्यामुळे आनंद व्यक्त केला. “आमच्या मुलीचे भविष्य वाचवून निलेश बेलखेडे हे देवदूत ठरले,” असे पालकांनी म्हटले.

विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस

ही घटना DBATU विद्यापीठाच्या ढिसाळ व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे करते. विद्यापीठ प्रशासनाच्या चुका विद्यार्थ्यांच्या करिअरवर गंभीर परिणाम घडवत असूनही योग्य ती कार्यवाही होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बेलखेडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

युवासेना सचिव इंजि. निलेश बेलखेडे यांनी वेळेत हस्तक्षेप करत विद्यार्थिनीची नोकरी वाचवली आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या सेवा वृत्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.