श्री साई नागरी सहकारी पत संस्थेचा कोट्यावधीचा घोटाळा बाहेर येणार?

57

श्री साई नागरी सहकारी पत संस्थेचा कोट्यावधीचा घोटाळा बाहेर येणार?

समाजवादी पक्षाकडून जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनाची दखल, चौकशीचे आदेश.

 

चंद्रपूर/महाराष्ट्र 

दि. 11 अक्टूबर 2024

रिपोर्ट : अनुप यादव, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

सविस्तर बातमी: — जिल्ह्यातील माजरी येथे मुख्यालय असणाऱ्या श्री साई नागरी सहकारी पत संस्थेत चाललेला अनागोंदी कारभार व भारतीय रिझर्व बैंकेच्या मार्गदर्शक तत्वाशी केलेली काडीमोड, शिवाय सहकार कायाद्याचे केलेले उल्लंघन यामुळे चर्चेत आलेल्या श्री साई नागरी सहकारी पत संस्थेच्या विरोधात संस्थेच्या सभासदांनी समाजावादी पक्षाकडे केलेल्या तोंडी तक्रारीवरून समाजावादी पक्षाचे पदाधिकारी तनशील पठाण यांच्यामार्फत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदन देऊन श्री साई नागरी सहकारी पत संस्थेचे चाचणी लेखापरीक्षण करून दोषी संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली होती, त्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक सारडा यांनी श्री साई नागरी सहकारी पत संस्थेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान या संस्थेचे लेखापरीक्षण झाल्यास कोट्यावधी रुपयाचे बेकायदेशीर कर्ज प्रकरणे व सहकारी कायाद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण सूर, संचालक राहुल बालमवार यासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल होण्याची चिन्हे दिसत आहे.

 

श्री साई नागरी सहकारी पत संस्थेच्या माजरी वरोरा व भद्रावती येथे तीन शाखा आहेत या शाखा मार्फत दररोज लाखों रुपयाचे दैनंदिन कलेक्शन व शेकडो ग्राहकांच्या फिक्स डिपॉझिट आहे, दरम्यान या शाखामार्फत संचालकांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात कर्ज दाखवून संचालकांनी ते कर्ज स्वतः उचल केल्याचे बोलल्या जात आहे. संस्थेला जवळपास 7 वर्ष झाली असतांना सुद्धा आजवर सभासदांना डिव्हिडंट दिल्या गेला नाही, सभासदांची वार्षिक सभा सुद्धा घेतल्या जात नाही व सभासदाव्यतिरिक्त दुसऱ्यांना कर्ज देऊन सहकार कायाद्याचं उल्लंघणं केल्या जात आहे. असे अनेक कर्जदार आहेत जे संस्थेच्या सभासदांच्या यादीतच नाही, शिवाय कर्ज प्रकरणात कर्जदारांकडून तारण ठेवले गेले नसल्याचे पण समोर आले आहे त्यामुळे केवळ संचालकांच्या मर्जीने या पतसंस्थेत कामकाज चालत असल्याने या पतसंस्थेची कोट्यावधीची कर्ज वसुली होतांना दिसत नाही, दरम्यान या संस्थेचे चाचणी लेखापरीक्षण केल्यास संचालकांचे पितळ उघडे पडू शकते,

संस्थेचे संचालक वसंता चवले मुख्य कार्यकारी अधिकारी कसे?

 

कुठल्याही वित्तीय संस्थेत त्या संस्थेच्या संचालकांना त्या संस्थेत नौकरी करण्याचे किंव्हा मानधन उचलण्याचे सहकार कायाद्यानुसार अधिकार नाहीत मात्र श्री साई नागरी सहकारी पत संस्थेत वसंता चवले हे स्वतः संचालक असतांना त्यांनी माजरी शाखेत मानधन तत्वावर नौकरी केली आहे व आता ते तीन महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहे, सहकार कायाद्यात याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद संचालक सांभाळू शकतात पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही शिवाय ते इतर सुविधा घेऊ शकत नाही पण मागील अनेक वर्षांपासून ते संचालक असताना सुद्धा संस्थेत नौकरी करत असल्याने त्यांनी घेतलेल्या मानधनाची वसुली कायद्याने होऊ शकते. अर्थात जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशीचे आदेश दिल्याने व चाचणी लेखापरीक्षण अहवाल आल्यानंतर या संस्थेचा कोट्यावधीचा घोटाळा बाहेर येण्याची दाट शक्यता आहे, दरम्यान या संस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाल्याने या संस्थेत कुणी ठेवी ठेवण्यास पुढे येईल का हा प्रश्नच आहे.