अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर मनपाची कारवाई
चंद्रपूर २३ नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन अनधिकृत रीतीने उभे करण्यात आलेले मार्कींगचे सिमेंट खांब तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.
ठक्कर कॉलनी येथे ईरई नदी पात्राजवळ मौजा गोविंदपुर रीठ सर्वे नंबर ७३/१ तसेच जवळच असलेल्या नाल्याजवळील पुलाच्या बाजुला चांदा रयतवारी सर्वे नंबर ४९ असलेल्या भूखंडावर अनधिकृत ले आउट टाकुन प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती मनपा पथकास मिळाली होती. त्यानुसार पाहणी केली असता सदर भूखंड हा पूरग्रस्त भागात असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२ अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीस स्वीकारण्यास सदर बांधकामदाराने नकार दर्शविला होता त्यामुळे सदर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ले आऊटवर प्लॉटची विक्री करण्यास मार्कींग सुद्धा करण्यात आली होती.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. शहरात जिथेही अनधिकृत ले आऊट आहेत तिथे कारवाई सुरु राहणार असल्याने अनधिकृत ले आऊट वर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांना शहरातील अनधिकृत ले आउट संबंधी माहिती असल्यास ती मनपास देण्याचे आवाहन मनपामार्फत करण्यात येत आहे.